Wednesday, October 24, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १५


       संध्याकाळी ती वेळ झाली आणि सपनाला भीती वाटू लागली. पटापट जेवण उरकून वैशूकडे जायचं तिने ठरवलं होतं. त्यासाठी सिरीयल बुडाली तरी तिला चाललं असतं. पण तिच्या दुर्दैवाने बेल वाजली होती. बन्या आणि संत्या आलेले होते. आज दुपारी शाळेतून आल्यापासून सरही एकदम खूष होते. किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. आपल्या सर्व कल्पना त्यांनी बाईंना आणि सपनाला सांगत दिवसभर भंडावून सोडलं होतं. बन्या आणि संत्या आल्यावर आपली सुटका झाली असंच बाईंना वाटलं. ते दोघे आल्यावर सरांनी लगेचच सरबत करायला सांगितलं बाईंना. दोघेही सरांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होते इतके का ते खूष आहेत म्हणून.  
        सरांनी एक मोठा तक्ता बनवला होता. त्यावर चार भाग केले होते. वर्ग, शाळा, मुले आणि इतर सुविधा असे. प्रत्येकाच्या काय सुविधा हव्यात ते लिहून ठेवलं होतं. एकदम त्यांचा तो तक्ता बघून संत्याला सरांच्या क्लासचीच आठवण झाली. तितकंच ते नीटनेटकं लिखाण, अगदी मुद्देसूद, जणू भूमितीची प्रमेयच. वर्गात लाईट, पंखे, बेंच, तक्ते अशा काही दुरुस्त्या होत्या. शाळेसाठी, पाण्याची टाकी, कचराकुंडी, मुलं-मुलींची बाथरुम असे काही मुद्दे होते. मुलांसाठी, खेळाचं साहित्य, चित्रकलेचं सामान, कंप्युटर अशा काही वस्तूंची यादी होती. बाकी शाळेच्या बाजूने लावायचं कुंपण, बाहेरील भिंतींना द्यायचा रंग हे सर्व इतर गोष्टींमध्ये आलं. कामांची अशी यादी केलेली पाहून बन्या खूष झाला. 

"हे झ्याक केलंत सर तुम्ही. आता प्रत्येक गोष्टीचं शेप्रेट बजेट काढता यील.", बन्या त्या तक्त्याकडे बघत बोलला. 

"हे फक्त काय लागणार आहे त्याबद्दल आहे रे. मूळ कल्पना तर मी तुम्हांला सांगितलीच नाहीये.", सर जोमाने बोलले. 

दोघेही बघत होते फक्त सरांकडे. 

"हे बघा, आता या प्रत्येक कामाचे तुम्ही बजेट काढणार मग त्यातलं निम्मं पैशामुळे कॅन्सल होणार.", सर थेट बोलले.

"असं काही नाही सर, आपण बोलू की आबांशी.", बन्या बोलला.

"अरे हो, तू बोलशील रे. पण त्यापेक्षा मी काय म्हणतो ते ऐक. फक्त मुख्य कामांना, गोष्टींना जे काही पैसे  आणि माणसं लागतील तेव्हढंच बजेटमध्ये टाकायचं. आणि बाकी कामांसाठी गावातल्या लोकांकडून मदत मागायची.", सर हे सांगत होते, पण त्या दोघांनाही ते झेपेना. 

"संतोषराव तुम्ही सांगा, आपल्या गावात किती तरणी पोरं सांध्याकाळच्याला इकडं तिकडं फिरत असतात.", आता सरांनी असं डायरेक्ट बोलल्यावर त्याला काय बोलावं कळेना. बन्या गालात बारीकसा हसला असंही त्याला वाटून गेलं. 

"हा असतील १५-२० तरी.", तो शेवटी विचार करुन बोलला. 

"हा आता त्या १५-२० पोरांनी शाळेत येऊन थोडी मदत केली तर?", सरांनी विचारलं.

"नुसतं त्या तरण्या पोरांनीच नाही तर आता शाळेत शिकणाऱ्या पोरांच्या घरातलं एक तरी माणूस घ्यायचं. प्रत्येक घरातून एकेक केलं तर किती लोक जमा होतील?", सर बोलले. 

त्यावर बन्याची ट्यूब पेटली. त्याच्या प्रकाशाने त्याचे डोळे एकदम मोठे झाले. बन्याला असं एकदम जोशात पहिल्यांदाच बघत होता संत्या. 

"ही भारी आयडियाये.", बन्या एकदम चेकाळून बोलला. 

"होय का नाही? गावातल्या पोरांसाठी शाळा सुधारणा करतेय तर गावाची मदतही पायजेच.",सर बोलले. 

"पर ऊसाची कापणी चालूय, लोकं काम सोडून कसं येतील?", संत्यानं एकदम बरोबर मुद्दा काढला होता. 

"आपण सुट्टीच्या दिवशीच काम काढू ना? हफ्त्याची सुट्टी असतेय तेव्हांच.", सर बोलले. 

"अन त्यांच्या जेवण-खान्याची सोय करायची त्या दिवसाची, मग अजून लोकं येतील.", बन्याला लोकांची मानसिकता चांगलीच माहित होती. 

"हां करेक्ट",सर म्हणाले. 

"बरं एक काम करु आता प्रत्येक कामाला काय काय लागेल हे सर्व मांडू, म्हणजे कळेल लोकांची मदत कशात लागेल आणि काय सामानासाठी पैसे, बाहेरुन मदत लागेल.", सर बोलले. 

       संत्याने मान हलवली. त्याला एकदम वेगळं वाटत होतं काहीतरी वेगळ्या जगात असल्यासारखं. आयुष्यात असं कधीच केलेलं नव्हतं त्याने. एका उदात्त हेतूने काहीतरी करण्यात किती आनंद मिळू शकतो हे तो आता समजू लागला होता. त्यात सपना आजूबाजूला आहे याची जाणीव. एका वेगळ्याच टप्प्यावर आला होता तो. काही वेळाने, सरांनी सपनाला हाक मारली. दुसऱ्यांदा बोलावल्यावर ती नाईलाजाने बाहेर आली. 

"आत काय बसलीयस? इथे इतकं महत्वाचं काम चाललंय.जा एखादी वही घेऊन ये आणि बस खाली. ", सरांनी तिला दटावलं. 

      ती एक जुनी वही घेऊन आली आणि खाली बसली त्यांच्यासोबत. सरांनी हातात वही घेत शेवटच्या पानावर लिहायला पाहिलं. तिच्या अभ्यासाच्या काही वेड्यावाकड्या नोट्स त्याच्यावर लिहिलेल्या होत्या. तिचं ते अक्षरंही संत्याच्या ओळखीचं. त्याने पुन्हा ते बघायचं टाळलं. सरांनी पानं पालटून लिहायला सुरुवात केली. बांधकामाची कामं कुठली, त्याला लागणारं साहित्य, गवंडी लोक, पैसे दिवस हे सगळं हवं होतं. 
"तुम्ही लिहा सगळं, मी काँट्रॅक्टरना भेटून येतो दोन चार. किती पैसे, लोक, वेळ सगळं विचारतो. बघू काय सांगतात.", संत्या ते पाहून बोलला. 
"हां, तसं करुया.", बन्याने होकार दिला. 
वर्गांच्या कामाची, लागणाऱ्या साहित्याची यादी झाली. सपनाही हळूहळू त्यात गुंतत गेली. दोन चार वेळा तिची-त्याची नजरानजरही झालीच. त्याला नाईलाज आहे असं म्हणून ती गप्प बसली. तरीही संत्याची अस्वस्थता तिला क्षणात कळून गेली होती. 

"अरे हो, लोकांना सांगायला, बोलवायला प्लेक्स बोर्ड लावाय लागतील. त्याच्याआधी तारीख ठरवाय लागंल.", बन्याला आठवलं. 

"हे कॉन्ट्रॅक्टरचं, बजेटचं सगळं कळल्याशिवाय लोकांना सांगून काय फायदा न्हाई. ", संत्या बोलला. 
सरांनी ते फ्लेक्सचं लिहून घेतलं. 

"अजून एक काम आपल्याला हातोहात करता येईल. वर्गातले तक्ते. घरबसल्या कुणाला तरी सांगून करुन घेता येईल.", सर बोलले. 

"संत्या एक काम कर, तुझ्याकडं कोन पोरं असतील तर ते वर्गातले तक्ते करायचं बघ की. ", बन्याने त्याला सांगितलं. 

"हां हायेत एकदोन चांगलं अक्षर हाय त्यांचं. कुटल्या वर्गात कसलं तक्ते पायजेल ते लिहून द्या म्हंजे झालं.", संत्या सरांकडे पाहून बोलला. 

"सपने तू सांग गं. प्रत्येक तुकडीत काय काय अभ्यास ते सगळं तुला म्हायतीच आहे. ",सर तिच्याकडे पाहून बोलले. 

ती 'हो' म्हणाली. ती संत्याकडे बघत आठवेल तसे तक्ते सांगू लागली. तोही लिहून घेऊ लागला. त्याचं अक्षर ती पहिल्यांदाच बघत होती. एकदम रेखीव, सुंदर आणि नीटनेटकं, त्याच्या व्यक्तिमत्वाला अजिबात न शोभणारं. मग तिला आठवलं, त्याने तिचं कोरलेलं नाव. तेही रेखीवच असायचं की. पण त्याचा विचार करायची कधी वेळच आली नव्हती. कामाच्या नादात, रात्रीचे बारा कधी वाजून गेले कुणालाच कळलं नव्हतं. मध्ये दोन वेळा चहा, सरबतही झालं होतं. 

शेवटी बाई म्हणाल्या,"लै काम झालं एकाच दिवसात. झोपा आता.". 

त्या असं बोलल्यावर सर थांबले, म्हणाले,"हां खूप उशीर झालाय. झोपा तुम्ही पण. उद्या यातली जमेल तशी माहिती काढून घेऊन या. मग बोलूच पुढं.". 

       सर्वांनाच ते पटलं. भरपूर कामं होती उद्यासाठी. सगळ्यांच्यात इतका उत्साह भरला होता की काय बोलू, काय सुचवू असं प्रत्येकाला झालं होतं. जाईपर्यंत अजून ५-१० मिनिटं गेलीच. अगदी दारात उभे राहूनही दोन चार गोष्टी बोलू झाल्या होत्या. ते दोघे गेल्यावर घर एकदम शांत झालं. संत्या नसतानाही त्याचा मोजकंच बोललेला तो आवाज भरुन राहिलाय असं तिला वाटलं. त्याची पेन धरण्याची पद्धत, वहीत लिहिलेलं रेखीव अक्षर, तिच्या नजरानजर झाल्यावर आलेली एक भीतीची लकेर. सपना खाटेवर पडूनही जे झालं त्याचा विचार करत राहिली बराच वेळ.

-क्रमशः
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: