Thursday, October 04, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ५

       साडेसहाला फोनवर गजर वाजला आणि संत्या झटक्यात उठला. कालचा दिवस डोळ्यांसमोर अजूनही होताच. बाहेर आला तर रेडिओवर कुठल्यातरी वेगळ्याच भाषेत काहीतरी कार्यक्रम चालू होता. काकी बंबात लाकडं घालत होती. पप्पा उठून दाढी करत होते. त्याला बघून दोघंही गारच पडले. संत्याला कळत नव्हतं इतक्या लवकर उठून करायचं काय? पप्पांसोबत जायचं म्हटल्यावर जिमला जायचं नव्हतं. तो फोन घेऊन संडासात गेला तरी तिथंही कुणी जागं नव्हतं. तो रोज सकाळी उठायचा तोवर गुड मॉर्निंग, शुभसकाळचे १५-२० मेसेज पडलेले असायचे फोनवर. अम्या, विक्या काहीतरी फालतू जोक का होईना टाकायचेच. पण आज तेही नव्हतं. मग बसल्या बसल्या त्यानंच सगळ्या ग्रुपवर जुनाच एक 'शुभ सकाळ' मेसेज टाकून दिला. 

          ब्रश करताना त्याला बागेची चांगली पाहणी करता आली. खरंतर संत्याला फुलांची खूप आवड. निरनिराळी कलमं आणून तो लावायचा पूर्वी. शाळेत असताना तर प्रत्येक झाडाला कधी कळी येते आणि त्याचं कधी फूल होतं असं त्याला वाटायचं. कितीतरी वेळा एखादं फूल सपनीला द्यायचीही इच्छा व्हायची. पण हिम्मत कधी झाली नाही. आज वेळ मिळाला होता तर त्यानं गुलाबाच्या वाढलेल्या बुंध्याच्या खाली नीट आळं केलं. भांडी घासून खरकटं पाणी पसरत होतं ते नीट मार्गाला लावून झाडांकडं सोडलं. झाडांच्या वाढलेल्या, सुकलेल्या काटक्या तोडल्या. त्याचं हे काम होईपर्यंत पाटलांची दाढी, आंघोळ झाली होती. त्यानेही नंबर लावला. घरातलेच कपडे घालून चहा-बटर खाल्ले. रात्री बहुतेक पाटलांनी काकीला सांगितलं होतं. कारण चहा झाला की लगेचच तिनं त्याला इस्त्रीचा शर्ट आणि पॅन्ट आणून दिले. त्यानंही मुकाट्यानं घालून घेतलं.

        आज पुन्हा गाडी मागवली होती. आठलाच गाडी कोरेगांव सोडून सातारला लागली होती. रस्त्यात कधी नव्हे ते संत्यानं अभंगवाणी ऐकली गाडीत, पाटलांची आवडती. सातारला गाडी कालच्यापेक्षा दुसऱ्याच रस्त्याला वळली. आज पुन्हा पार्टी ऑफिसला जायचं असं संत्याला वाटलं होतं. पुढे जाईल तसं त्याची उत्सुकता वाढली. गाडी एका गल्लीत थांबली. गाडीतून दोघे उतरल्यावर ड्रायव्हरने गाडी पार्किंगसाठी फिरवून घेतली. समोर एक पाटी लावलेली होती. 'प्रकाश फोटो स्टुडिओ'. संत्याला तर काय समजत नव्हतं. पाटील आले तसे एक पोरगेलासा माणूस बाहेर आला आणि लगेचच पाटलांच्या पाया पडला. त्यांनीही,"आयुक्षवंत हो" असा मोठ्या आवाजात आशीर्वाद दिला.

"या साहेब, तुमचीच वाट बघत होतो.", त्याच्या आवाजात अदब होती.
         
      पप्पा त्यांच्याशी बोलेस्तोवर संत्यानं स्टुडिओची पाहणी करुन घेतली. काऊंटरच्या काचेत खाली पासपोर्ट, आय डी कार्ड असे २०-२० फोटोंचे सेट चिकटवलेले होते. मागे गणपतीच्या फोटोला छान हार घातलेला होता. सकाळ असल्याने नुकत्याच लावलेल्या उदबत्तीचा गंध दरवळत होता. तिथलाच अष्टगंधही त्या माणसानं कपाळी लावलेला होता. पोटावरुन शर्ट जरा जास्तच टाईट झालेला. पण तरीही अंगात उत्साह मात्र, सळसळता की काय म्हणतात ना तसा होता. भिंतीवर निरनिराळे फोटो चिकटवलेले. संक्रांतीचे दागिने घातलेल्या, डोहाळ जेवणातला चंद्रावर बसलेला, लग्नासाठी काढलेला असे अनेकविध स्त्रियांचे फोटो त्याला दिसत होते. एक दोन हिरो हिरोईनचेही पोस्टर लावलेले होते. एकूण रंग लावायला भिंतीवर विशेष काही जागा ठेवली नव्हती. कोपऱ्यात स्टॅण्डवर टेकवलेला चंद्रही होताच. हे सगळं असलं तरी आपण इथे काय करतोय हे संत्याला कळेना.
तो एका गालाला तीट, डोळ्यांत काजळ, हातात कडे, पायात वाकी घातलेला, लहान मुलाचा बसलेला फोटो बघत असतानाच मागून आवाज आला, "आमच्या भावाचा पोरगा, अर्णव नाव ठेवलंय.". 
"मी प्रकाश, हा आपलाच स्टुडिओ साहेब. साहेबांची लै मदत झालेली सुरु करताना. त्यांनी मदत केली म्हनून आज उभा आहे.", प्रकाशच्या डोळ्यांत त्याच्या स्टुडिओचा गर्व दिसत होता. 
"सॉरी साहेब तुम्हाला इतक्या सकाळी यायला लागलं. दुपारी लग्नाचं शूटिंग हाय ना एक. नाहीतर तुमच्यासाठी बाकी काय पन सोडून दिलं असतं.", प्रकाश पाटलांना विनंतीचा स्वरात सांगत होता. 
पाटील, "असू दे, असू दे" म्हणत होते.
संत्याला प्रकाशने,"या साहेब" म्हणून हात आत दाखवला. तो त्याच्या मागे गेला. 
"साहेब हे कुर्ते आणून ठेवलेत काल मार्केटमधून तुम्ही तेव्हढे घालून बघता का म्हणजे कुठला बसतो ते कळंल?", प्रकाशने विचारलं. 
संत्या पप्पांकडं बघायला लागला. 
"हां ते घालून दाखवा", त्यांनी इतकंच सांगितलं. 
घट्ट झालेला कुर्ता अंगातून काढताना संत्याची लै चिडचिड झाली. पण नाईलाज होता. पप्पा समोरच बसले होते. 
शेवटी एक कुर्ता बसला मस्त. 
"हां कसा मस्त बसलाय बरोबर, उंची पण साहेबांसारखीच हाय तुमची.", प्रकाश बोलला. 
त्यानं संत्याला खादीचं जॅकेट दिलं. त्याने तेही नाईलाजानं घातलं. संत्यानं आजवर मित्रांच्या लग्नांत पण कधी कुर्ता जॅकेट घातलं नव्हतं. आपला टीशर्ट आणि जीन्स त्याचं ठरलेलं. कपडे घालून झाल्यावर प्रकाशनं त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. समोर आरसा होता. संत्यानं पहिल्यांदा स्वतःकडे पाहिलं. एकूण पेहराव 'ठीक वाटतोय' म्हटल्यावर त्याचा राग जरा कमी झाला. खुर्चीत बसल्यावर प्रकाशने मेकअपचा बॉक्स काढला. चांगलं क्रीम त्याच्या चेहऱ्यावर लावलं. असं परक्याकडून तोंडाला हात लागल्यावर संत्याला कसंतरी झालं. तरी गप्प बसला बिचारा. क्रीम मग फौंडेशन, पावडर सगळं लागलं. लिपस्टिक हातात घेतल्यावर मात्र संत्या संतापला. 
"बास की, मगाधरनं थापायलायस निस्ता", म्हणत संत्या तिथून उठलाच. 
त्याचा एकूण पेहराव बघून पाटील मात्र खूष झाले. 
"हां आता कसं शोभताय आमचा पोरगा म्हणून",  त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले. 
त्याच्या पाठीवर अशी त्यांची थाप किती वर्षांनी पडली असेल. 
लवकरच संत्याचं फोटोसेशन सुरु झालं. मागे एक मोठा फिकट रंगाचा पडदा टाकला गेला. समोरुन मोठे तीन लाईट निरनिराळ्या अँगलने लावले. स्टँडवर कॅमेरा ठेवून प्रकाश उभा राहिला. 
"हा साहेब, इथं असं मध्ये उभे राहा आनी मस्तपैकी स्माईल द्या बघू", तो बोलला. 

       दोन्ही हात मोकळे सोडून संत्या उभा राहिला आणि दात काढून हसला. त्याचं हसू बघून प्रकाश एक मिनिट विचार करायला लागला. त्यानं संत्याला किती हसायचं, ओठ किती लांब गेले पाहिजेत, ओठांच्या मध्ये किती फट दिसली पाहिजे, हात कुठे ठेवले पाहिजेत हे सर्व सांगितलं. संत्यानं खूप प्रयत्नांनी दोन चार फोटो काढून घेतले. पण प्रकाशला पायजे तसं हसू काय येईना.
शेवटी तो म्हणाला,"साहेब एक काम करु, पाच मिंट ब्रेक घ्या, चहा सांगतो चांगला, मग परत घेऊयात.". संतोषने मान हलवली. 
दोन मिनिट संधी मिळाल्यावर त्यानं फोन चेक करायला सुरुवात केली.
पहिलाच मेसेज आला होता विक्याचा,"वहिन्यांच्याच बसमध्ये बसलोय, काय निरोप सांगायचा का?" आणि पुढे डोळा मारणारा स्माईली टाकला होता. 
मेसेज वाचून संत्याच्या चेहऱ्यावर सपनीच्या आठवणीनं हसू पसरलं. नेमका तेव्हढ्यात चहाचा ग्लास हातात द्यायला आलेल्या प्रकाशनं ते बघितलं. 
"हां हां हे असंच हासू पायजे. एकदम पर्फेक्ट", प्रकाश संत्याला म्हणाला. 
"हां जोक वाचत हुतो", संत्यानं सावरासावर केली.
         एकूणच विक्या आज गावात आहे म्हटल्यावर सपनी घरी परत जाईपर्यंत त्याला काळजी नव्हती. त्या विचारानं तो जरा निर्धास्त झाला. एकेक करत त्यानं प्रकाश म्हणेल तशा पोझ देत फोटो काढून घेतले.
"नशीब तोंड चामड्याचं हाय, नाहीतर एव्हडं  दात काढून तुटलं असतं", संत्यानं मनात विचार केला.
        फोटो काढायचा हा कार्यक्रम चांगला चार तास चालला. गाडी दुकानातून बाहेर पडली आणि तडक एका हॉटेलला थांबली. पप्पांचं आवडतं हॉटेल ते. जेवायची वेळ झालीच होती. ड्रायव्हर आणि त्ये दोघं अशा तीन थाळ्या सांगून ड्रायवर बाहेर आणि पाटील एसी सेक्शनमध्ये बसले. संत्या हात धुवून त्यांच्या समोर बसला. दोघांनी समोरासमोर असं एकटं बसायची पहिलीच वेळ असेल. त्याला सुचत नव्हतं काय बोलावं.
पाटलांनी आपल्या रुमालाने हात पुसून त्याची घडी घालून पायजम्याच्या खिशात ठेवली आणि म्हणाले,"संतोषराव, ही दुनिया इतकी विचित्र हाय. आपण हे फोटो का काढले म्हायतेय? ". 
त्याने नकारार्थी मान हलवली. 
"काल तुम्ही भेट्लान दादासाहेबांना? कशासाठी म्हायतेय?", पाटील. 
पुन्हा नकारार्थी मान. 
"आपल्या पार्टीसाठी नव्या पिढीच्या नेत्यांची गरज हाय. या निवडणुकीत आपल्या गावातल्या नव्या पिढीचं नेतृत्व नाही दिसलं तर आपलं तिकीट पन जाईल. ", पाटील बोलले. 
संत्याला ते समजलं, त्याने मान हलवली. 
"या जगात कितीबी म्हटलं तरी आपन कसे दिसतो त्ये लोक बगतातच. काल तुला सायबांना भेटवलं, त्यांनी लाख म्हनू दे कपड्यानं काय होत न्हाई. पन स्वतः घालत्यातच ना?", पाटील बोललं. 
तो "हो" म्हणाला. 
"तुमाला पन त्येच करायला लागनार हाय. इतकी वर्षं तुम्ही काय केलंय तुमाला ठावू आन मला पन. आता बास त्ये सगळं. पार्टीला, आपल्याला तुमची गरज हाय. आपल्या गावात इतकी तुमची मित्र मंडळी आज नायतर मग काय कामाची? बरोबर ना?", त्यांनी त्याच्याकडे डोळे रोखत विचारलं. 
तो "हो" म्हणाला. 
"उद्या आता हे सगळे फोटो गोळा करायला या परत हिकडं. अमी किती दिवस पळापळ करणार सगळीकडं? तुम्हाला करायला शिकलं पायजे आता. त्ये बी न सांगता.", पाटील असं बोलले इतक्यात जेवणाची थाळी आली. त्यांनी पोटभर जेवण केलं, त्यालाही करु दिलं. बिल भरुन ते गाडीत बसले. त्याला त्यांच्या बोलण्यातून कळलं होतं काम किती महत्वाचं आहे. 
तरीही गाडी गावाकडं परत जाताना ते एकदा बोललेच,"लक्षात ठेवा काम जोखमीचं हाय. आपल्या गावात नवयुवक संघटना उभी करायचीय. आजवर आपल्या वडलांनी, आजोबांनी इतकी कामं केलीत. त्यांची इज्जत ठेवा. ". 
संत्या "हो" म्हणाला. गाडीतून बाहेर बघता बघता कधीतरी त्याची झोप लागून गेली.

-----------

घरी आल्यावर संध्याकाळी बाहेर जायचीही त्याची इच्छा होत नव्हती. आपल्याला काहीतरी काम करायचं आहे पण ते कसं करणार, कोण सांगणार, काही सुचत नव्हतं त्याला. तो टीव्हीवर गोविंदाचा पिक्चर बघत बसला. तो लागला की त्याला जरा बरं वाटायचं. 
रात्री झोपताना मात्र त्यानं विक्याला फोन केला,"काय रं झोपलेलास का?". 
"न्हाई तुझ्याच फोनची वाट बगत होतो", विक्या म्हणाला. 
"म्हंजी?", संत्या. 
"काय नाय, तू बोल", विक्या हसला. 
"तू बघितलंस तिला?", त्यानं विचारलं. 
"हां घरी पोचलेली पाहिली नीट",विक्या. 
"हां बरं झालं.", संत्याला बरं वाटलं. 
"कुटला ड्रेस घातलेला?", संत्यानं विचारलं. 
"हे बघ मी काय असलं फालतू बघत बसत न्हाई. तुज्या जीवाला घोर नको म्हनून फक्त पोचली का ते पायलं", विक्या चिडून बोलला. 
"आरं असा चिडतूस काय? असंच लै दिवस झालं तिला बगून म्हनून इचारलं", संत्या दुःखानं बोलला. 
"लै न्हाई, दोनच", विक्या जोरात बोलला. 
"दोनच? मला तर युगं लोटल्यागत वाटतंय. जाऊ दे, तू झोप. ठेवतो", म्हणून संत्यानं फोन ठेवला आणि छताकडे बघत खाटेवर पडून राहिला. 

- क्रमशः       
विद्या भुतकर. 

No comments: