Sunday, October 28, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १७


सकाळी सपना उठली ती अजून स्वप्नातच असावी अशी. सकाळच्या पेपरमध्ये कालची बातमी आलेली होती. सरांनी एकदम मोठ्याने वाचून दाखवली. त्यात त्यांचा सर्वांचा एकत्र फोटोही होता. तो बघून सपना हसली, संत्या त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये खिशात हात घालून एका पायावर थोडा तिरका उभा होता. 

"किती काम उरकलं ना?", सर म्हणाले. 

"हो नं, मला वाटलं नव्हतं इतकी माणसं येतील.", बाई बोलल्या. 

"चांगलं काम केलं पोरांनी.", सर आठवून बोलले. 

"होय की", बाई.

          सपनाचं मात्र कशात लक्ष नव्हतं. दिवसभरात मोजून चार शब्द बोलली असेल ती. संध्याकाळ झाली तरीही तिची काहीच करायची इच्छा होईना. ती घड्याळाकडे बघत होती आणि तिचे कान फक्त दाराकडे बघत होते. कधी बेल वाजते आणि ती दरवाजा उघडते असं तिला झालं होतं. बेल वाजलीच. तशी सपना पळत दरवाज्याकडे धावली. शेजारची पोरगी आली होती. सपनाचा हिरमोड झाला.

"झंडूबाम हाय का?", पोरीने विचारलं.

"काय गं काय झालं?", बाईंनी विचारलं.

"आईचा पाय दुखतोय. त्ये काल जरा काम जास्त झालं ना शाळांत.", पोरगी बोलली.

"हां बरोबर. काय लागलं तर सांग, गोळी पण आहे.", बाईंनी तिला सांगितलं.

"कपाटाच्या वरच्या कप्प्यात आहे बघ.", बाईंनी सपनाला सांगितलं.

          सपनाने शोकेसमधून झंडूबाम काढून दिलं. ती पोरगी झंडूबाम घेऊन निघून गेली. सपनाला वाटलं आता रडूच येईल की काय आपल्याला. ती जेवण करुन खाटेवर पडली आणि तिला रडू येऊ लागलं. का? कशाचं? काही कळेना? जोरजोरात आरडून रडावंसं वाटत होतं तिला.

        दोन दिवस झाले तरी अंगावरची मळ जात नव्हती. केसांतली धूळ, हातांवरचा काळा थर आणि संत्याचे विचार. कपडे काढून ती अंघोळीच्या पाटावर तशीच बसून राहिली. शरीरावर जणू त्याच्या अस्तित्वाच्या नसलेल्या खुणा शोधत. त्या दिवशी दारु पिऊन तिचा पकडलेला तो हात, त्याचा स्पर्श आता आठ्वणीतही टोचत नव्हता. त्याच्या नशेतल्या डोळ्यांची जागा, त्याच्या कष्टाने दमलेल्या तरीही काम करणाऱ्या डोळ्यांनी घेतली होती. तिला हवं होतं अजून. त्याचा स्पर्श, त्याचा श्वास, त्याचं शरीर तिच्या अंगावर. पण केवळ कल्पनाच त्या. बाईंनी दारावर थाप मारली तशी सपना भानावर आली. आपल्या एकटेपणात असा अडथळा आल्यावर सपनाला आईचा खूप राग आला. तिने अंघोळ केली आणि बाहेर आली. खोलीत जाऊन कपडे घातले आणि आरशासमोर वेणी घालायचं सोडून आपल्या चेहऱ्याकडे बघत बसली. 'त्याला काय आवडलं असेल यातलं?' असा विचार करत. 

         महिना होत आला होता शाळेचं रुप पालटून आणि सपनीने संत्याला बघूनही. शाळा, कॉलेज परत सुरु झालं. सपनाने सातारला तिच्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून तात्पुरतं काम सुरु केलं होतं. पीएचडी साठी ती सरांशी बोलत होतीच. एक प्रकारे आपण त्या विचारातून बाहेर पडलो ते बरंच झालं असं तिला वाटलं. उगाच अभ्यास सोडून दुसरा ताप कशाला? पावसात पुन्हा बसच्या चकरा सुरु झाल्या. आता तर वैशूही नव्हती सोबत आणि मागे वळून पाहायला संत्याची सावलीही. एकदा ती कामाला लागली आणि रोज सतावणारी त्याची आठवण जरा कमी झाली. या दरम्यान बरेच वेळा तिला मनोजचे कॉल येऊन गेले होते. त्याच्याशी बोलण्यातही तिला आता स्वारस्य उरलं नव्हतं. त्यामुळे ती त्याचा फोन आला तर सरळ कट करुन टाकत होती. 

          असंच एक दिवस तिने शेवटी सरांना विचारलं,"पप्पा ते शिंदे सरांना सांगितलं ना नाही म्हणून त्यांच्या मुलासाठी?". 
सरांनी बाईंकडे पाहिलं. 
"नाही अजून. मध्ये या शाळेच्या कामात बोलणंच नाही झालं.", सर बोलले. 
"कारण काय सांगणार गं पण? उगाचच नाही का म्हणायचं चांगल्या स्थळाला?", बाईंनी विचारलं. 
"काय म्हणजे? सांगा की मला जायचंय पुण्याला पुढच्या शिक्षणाला.", सपना. 
"अगं असं नाही तोडता येत एकदम माणसं.", सर. 
"मग काय डायरेक्ट लग्नच करुन टाकू का?", सपना रागानं बोलली. 
"एकदम टोकालाच जाते ही पोरगी." ,बाई चिडल्या. 
"मला जायचंय खरंच पुढं शिकायला.", सपना तावातावानं बोलली. 
"बरं बाई जा. काही सोयच नाही हिला कुणी बोलायची.", बाईही टोकाचं बोलल्या. 
"तुम्ही तेव्हढं सांगा त्यांना फोन करुन. त्यांच्या मुलाचा सारखा फोन येत राहतो मला.", असं बोलून ती कॉलेजला निघून गेली. 

--------------

शाळेच्या सुधारणेची बातमी गावातून शहरात आणि तिथून टीव्हीवर पोचली होती. फेसबुकवरही पार्टीच्या पेजवर संगळ्यांनी संत्याचं खूप कौतुक केलं होतं. पाटलांना तर आपल्या पोराला कुठं ठेऊ असं झालेलं. त्याच्याशी बोलतानाही त्यांच्या बोलण्यात एक अभिमान आणि आदर दिसत होता. त्याचबरोबर आपल्या पोराला आपल्याला येतं ते सगळं शिकवण्याचा अट्टाहासही. त्यामुळे रोज सकाळी ते त्याला शेजारी बसवून कामाची आखणी करत. त्याला सूचना देत. तोही शिकत होता हळूहळू. त्याच्याबरोबरच्या पोरांनी एकदम भारी काम केलं होतं. 

'त्यांना एकदा जेवायला घेऊन जा' असं पाटलांनी संत्याला सांगून ठेवलं होतं. आज उद्या करत शेवटी संत्या सगळ्यांना गावातल्या एकुलत्या एक हॉटेलात घेऊन गेला होता. 

     तेव्हांच त्याला सपना बसमधून उतरुन घरी परत येताना दिसली. अशी चार टाळकी दिसली की आपण मान खाली घालून जायचं इतकंच तिला ठाऊक होतं. तरी जाताना कुणीतरी शिटी मारलीच. कुणाला शिट्टी मारतोय बघितल्यावर संत्या चिडलाच. त्या पोराकडं रागानं बघत तो तिच्या मागे पळत गेला. 

"सॉरी हं", मागून सपनीला आवाज आला आणि ती थांबली. एकतर सकाळपासून त्या मनोजच्या नाटकामुळं डोकं उठलेलं तिचं, त्यात कॉलेजमध्ये लेक्चरला पोरांनी दिलेला त्रास आणि आता हे. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तिने त्याच्याकडे वळून पाहिलं.
"सॉरी ते उगाच काहीतरी चेष्टा करत होते.", संत्या शरमेनं बोलला. 
"तुम्ही माझी काळजी करु नका. मला हे काही नवीन नाही. मलाच काय गावातल्या कुठल्याच मुलीला नवीन नाही.", सपना रागानं बोलली. 
संत्याने लाजेनं मान खाली घातली. 
"हे बघा कसे घोळके करुन बसतात. तिकडं स्टॅण्डवर पण असतातच. दुसरं काम काय यांना?", असं बोलून ती निघून गेली. 
तो तिथेच उभा राहिला ती वळते का काय बघत. डोक्याचा भुगा झाला होता रागानं.हॉटेलच्या मालकाला 'नंतर पैसे देतो काय होतील ते' असं सांगून पार्टी सोडून तोही घरी निघून गेला. 
रात्री कधीतरी अम्याचा फोन त्याला आला. 
"संत्या, जेवलास का?", त्यानं विचारलं. 
"जेवायला काय ठेवलंय का या पोरांनी, लाज आनली आज.", संत्या वैतागून बोलला. 
"आर बास की, किती इचार करशील अजून?", अम्या.
"असं न्हाई अम्या, आपल्या गावच्या पोरांची काय इज्जत हाय का न्हाई?", संत्या. 
"म्हंजे काय? सगळीच काय पडीक असतात काय?", अम्यानं विचारलं. 
"तसं न्हाई, मी इचार करतोय काय करावं यांच्यासाठी. आपन बी असंच हुतो, बोंबलत भटकायचो. त्यांना पन कायतर कामाला लावलं पायजे का न्हाई? उद्याला समद्यांना बोलाव हापिसला, त्यांच्यासाठी कायतर करुया. ", संत्या बोलत बोलत विचार करत होता. 
"बरं अन्तो. तू आदी शांत हो अन झोप बरं.", अम्या बोलला. 
त्याच्या आवाजानं संत्या नरमला. "सपनीची आठवन येतीय रं.", त्याने अम्याला सांगितलं. 
त्याला असं झुरताना पाहून अम्याला, विक्याला वाईट वाटायचं. 
"झोप आता आणि बग तिला सप्नात. आन आम्हाला बी झोपू दे. ठिवतो आता.", म्हणून अम्यानं फोन ठेवला. 

संत्या झाल्या प्रसंगाचा विचार करत बसला होता. आताशी कुठं जरा त्याला स्वतःबद्दल आदर वाटायला लागला होता आणि आता हे असं. 

- क्रमशः

विद्या भुतकर. 

No comments: